शोभायात्रा, धार्मिक कार्यक्रम व होमहवनाने भक्तिमय वातावरण
दिग्रस, दि. २९ मार्च : आर्यवैश्य समाजाची कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी यांच्या चैत्र स्थापना उत्सवानिमित्त दिग्रस शहरात २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.
उत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ८ वाजता आरती, सायंकाळी ७.३० वाजता हरहर महादेव भजनी मंडळाचे भजन, तसेच रात्री ८ वाजता महाआरती व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार (२९ मार्च) रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापना, पूजा व आरतीने उत्सवाची विधिवत सुरुवात होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता माता कन्यका परमेश्वरी यांच्या प्रतिमेची भव्य पालखी शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत कलशधारी महिला, आर्यवैश्य समाजाच्या महिलांचे लेझीम, टाळ व टिपरी पथक, भजनी मंडळे तसेच वारकरी भजनी मंडळ यांच्या सहभागाने वातावरण दुमदुमणार आहे. शेकडो आर्यवैश्य समाजबांधव कुटुंबासह सहभागी होणार असून संपूर्ण मार्गावर सडा व रांगोळ्यांनी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
मंदिरात आगमनानंतर सामूहिक महाआरती होईल. ३० मार्च रोजी नियमित आरती, भजन व महाआरती, तर ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुमकुम पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १ एप्रिल रोजी महिलांसाठी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत हळदी-कुंकू समारंभ होणार असून त्यानंतर भजन व महाआरती होईल. उत्सवाची सांगता २ एप्रिल रोजी सकाळी आरतीनंतर सकाळी ११.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होमहवन, सायंकाळी ६.३० वाजता महाआरती व रात्री ७ ते ९ दरम्यान महाप्रसाद वितरणाने करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी पूर्ण झाली असून आर्यवैश्य समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री कन्यका परमेश्वरी मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
रामदास पद्मावार, दिग्रस.

0 Comments