शेकडो दिग्रसकरांचा आरोग्यदायी उपक्रमाला मोठा प्रतिसाद.
![]() |
| बापूनगर येथे विजय गट्टावार यांच्या निवासस्थानी कडुलिंब अंतरसाल ‘सालामृत’ तयार करताना चिंतावार परिवार व उपस्थित शिबिरार्थी. |
दिग्रस :- चैत्र महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर आरोग्य संवर्धनाचा संदेश देणाऱ्या कडुलिंब अंतरसाल ‘सालामृत’ प्राशन शिबिराला दिग्रस शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला ‘सर्वरोगनिवारिणी’ मानले जाते. विशेषतः गुढीपाडव्याच्या सुमारास कडुलिंबाला आलेला नवा बहर औषधी गुणांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे या काळात कडुलिंबाच्या अंतरसालीचा किंवा पाल्याचा रस प्राशन केल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचा, पचनसंस्था तसेच रक्तशुद्धीकरणासाठीही तो अत्यंत गुणकारी ठरतो.
स्थानिक बापूनगर येथे विजय गट्टावार हे गेल्या २२ वर्षांपासून या आरोग्यदायी परंपरेचे जतन करत कडुलिंब अंतरसाल ‘सालामृत’ प्राशन शिबिराचे सातत्याने आयोजन करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला सतीश चिंतावार, स्नेहा चिंतावार, स्मिता उत्तरवार, रेखा गुज्जलवार, विद्या पवार, मिलिंद पाठक, रमेश व्यवहारे यांच्यासह परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. दररोज पहाटे शेकडो नागरिक या शिबिरात सहभागी होत ‘सालामृत’चा लाभ घेत आहेत. तसेच शहरातील ज्येष्ठ कृषी व्यावसायिक, ७८ वर्षीय किशोर बनगीनवार हे स्वतः गेल्या ४३ वर्षांपासून नियमित ‘सालामृत’ सेवन करत असून त्यांना यामुळे निरोगी व तंदुरुस्त जीवन जगता आले असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
![]() |
| श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर येथे किशोर बनगीनवार यांच्या मार्गदर्शनात शिबिरार्थींना कडुलिंब अंतरसाल ‘सालामृत’ वाटप करतांना. |
हाच अनुभव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने ते मागील १४ वर्षांपासून शिबिराचे आयोजन करीत आहेत. किशोर बनगीनवार यांच्या या कार्याला मंगेश दुद्दलवार, दत्तात्रय इरतकर, देवेंद्र चौधरी, बाळू इंगळे, मधुकर क्षीरसागर, सागर वर्मा, रुपेश डगवाल, विक्रम अटल, गजानन राठोड यांच्यासह श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे सहकार्य लाभत आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २० मार्च ते २४ मार्चदरम्यान, दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर तसेच बापूनगर येथे विजय गट्टावार यांच्या निवासस्थानी हे शिबिर संपन्न झाले. या उपक्रमात शहरातील विविध क्षेत्रांतील शेकडो नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत.
कडुलिंब निसर्गाचे आरोग्यरक्षक वरदान
कडुलिंबाचे झाड केवळ औषधीदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात जमिनीची धूप रोखणे, वातावरण शुद्ध ठेवणे, भरपूर प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करणे आणि माणसाला शीतल सावली प्रदान करणे अशा अनेक गुणांनी कडुलिंब निसर्गाचा खरा रक्षक ठरतो. आयुर्वेदानुसार कडुलिंब हे कडू, तिक्त व रक्तशुद्धीकारक असून त्वचारोग, मधुमेह, पचनविकार, ताप, संसर्गजन्य आजार यांवर अत्यंत प्रभावी मानले जाते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी कडुलिंबाचे झाड लावून त्याचे संवर्धन व संगोपन करावे, असे आवाहन किशोर बनगीनवार यांनी केले आहे.
.jpeg)
.jpeg)
0 Comments